नाणकशास्त्र
नाणकशास्त्र विभाग सोळावा: धम्मपद- नेपाळ नाणकशास्त्र- एकंदर शास्त्रीय वाढीचा आजमितीस विचार करतां नाणकशास्त्र हें नुकतेंच उदयास आलें आहे असें दिसेल; कारण प्राचीन लोकांनीं नाण्यांचे सार्वजनिक संग्रह केले असल्याचें दृष्टोत्पत्तीस येत नाहीं, कदाचित् उत्तम कौशल्याचे नमुने म्हणजे व्यक्तिशः कांहीं लोकांजवळ नाण्यांचा खासगी संग्रह असण्याचा संभव आहे. नाण्यांचा छोटा संग्रह करण्याचा मान पेट्रार्क् यास देण्यांत येतो, आणि त्यावरून पेट्रार्कच्या कालांत प्राचीन नाण्यांबद्दल लोकांची जिज्ञासा उत्पन्न झाली असण्याचा संभव आहे. त्या कालापासून उपलब्ध अशा अनेक नाण्यांसंबंधीं परिश्रमपूर्वक संशोधन करणें हें महत्त्वाचें काम असून त्या बाबतींत शास्त्रज्ञांनीं आजपर्यंत पुष्कळ प्रयत्नहि केले आहेत. ह्या नाणकशास्त्राचा उपयोग जगाचा इतिहास, त्यांत प्रचलित असलेल्यां धर्मसमजुती, निरनिराळ्या लोकांचे आचारविचार, त्यांनीं प्रगल्भ दशेस आणलेल्या विविध कला यांच्या ज्ञानास अत्यंत उपकारक होतो. इतकेंच नव्हे तर शिल्पासारख्या कलेचा सांप्रत शास्त्रशुद्ध अभ्यास करूं इच्छिणार्यास देखील ह्...